दररोज दीड लाख पुणेकरांना टँकरचा आधार
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)। पुणे शहरात पाणीटंचाईची समस्या अधिक गडद झाली असून, दररोज सुमारे १.५ लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेची आठ टँकर भरणा केंद्रे असूनही, मागणीच्या तुलनेत पुरवठा तोकडा असल्याने अनेक भ
tanker news


पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)।

पुणे शहरात पाणीटंचाईची समस्या अधिक गडद झाली असून, दररोज सुमारे १.५ लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेची आठ टँकर भरणा केंद्रे असूनही, मागणीच्या तुलनेत पुरवठा तोकडा असल्याने अनेक भागांमध्ये नियमित पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. यात सर्वाधिक फटका नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील नागरिकांना बसत आहे, कारण या भागात स्वतंत्र आणि कार्यक्षम पाणीपुरवठा योजना अस्तित्वातच नाही. त्यामुळे या गावांंमध्ये दररोज महापालिकेकडून तब्बल १०५० टँकर पाणी दररोज दिले जाते.

शहरात वडगावशेरी, रामटेकडी, सासवडफाटा, धायरी, पटवर्धनबाग, पर्वती, पद्मावती आणि चतुःशृंगी येथे महापालिकेची आठ टँकर भरणा केंद्रे आहेत. या केंद्रांमधून दररोज सुमारे १४०० टँकर पाणी वितरित केले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी १०५० टँकर केवळ नव्याने समाविष्ट ३४ गावांसाठी पुरवले जातात. याउलट, जुन्या शहरातील नागरिकांसाठी केवळ ३५० टँकर पाणी उपलब्ध आहे. महापालिकेकडून हे पाणी मोफत दिले जात असले, तरी ते गरजूंसाठी पुरेसे नाही. याव्यतिरिक्त शहरात खासगी टँकर लॉबीदेखील सक्रिय आहे. दररोज २५० ते ३०० खासगी टँकर महापालिकेच्या केंद्रांवरून पाणी भरून नेतात आणि ते प्रति १० हजार लिटरसाठी १५०० ते २ हजार रुपयांना नागरिकांना विकले जातात. या टॅंकर फेऱ्यांची संख्या वर्षाला तब्बल ४ लाखांच्या वर आहे. त्यामुळे पुणेकरांना महापालिकेचे पाणी मिळत नसल्याने पदरमोड करून पाणी घ्यावे लागत आहे.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande