रत्नागिरी, 9 मे, (हिं. स.) : जलजन्य आजार टाळण्यासाठी जनतेने योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
नवजात अर्भक व ५ वर्षांच्या आतील एकूण बालमृत्यूंपैकी ५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात. त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी ५ वर्षांच्या आतील बालकांचे आशा व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत सर्वेक्षण करून अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस क्षारसंजीवनी प्रात्यक्षिक व झिंक गोळ्या देऊन पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ग्रामपंचायत विभाग, पाणी गुणवत्ता विभाग, महिला बालविकास विभाग यांच्या समन्वयाने आरोग्य विभागाकडून अतिसार थांबवा मोहीम राबविली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समिती सभेमध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या सभेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, तसेच आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. जलजन्य आजार टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबत प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांचे टीसीएलद्वारे पाणी शुद्धीकरण करणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, पुरेसा टीसीएल पावडर साठा तसेच तो योग्य हवाबंद स्थितीत ठेवणे, नियमित ओ.टी. टेस्ट घेणे या सर्व बाबींचे पर्यवेक्षण करून काळजी घेणे याबाबतच्या सर्व सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी उपस्थित सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी अतिसार थांबवा मोहिमेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी