चंद्रपूर, 9 मे (हिं.स.)। भारतीय सैन्य हे केवळ रणांगणावर लढणारे शूर योद्धे नाहीत, तर प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. त्यांचे शौर्य, त्यांची निःस्वार्थ सेवा आणि मातृभूमीबद्दलची निष्ठा हीच खरी देशभक्ती आहे. १४० कोटी भारतीयांचा पाठिंबा सैन्याचा आत्मविश्वास वाढवतो. आज आपण पक्ष, धर्म, भाषा, जात विसरून एकत्र आलो आहोत, हेच भारतीयत्वाचे खरे दर्शन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर वंदन भारतीय सैन्याच्या शौर्याला या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत भारतीय सैन्याला सामूहिक वंदन केले. यावेळी आमदार जोरगेवार बोलत होते. कार्यक्रमास मनीष महाराज, पास्टर बिपीन, जामा मस्जिदचे मौलाना इमाम दिलशाद रजा, माजी सैनिक अश्विन दूर्गे, रोषण अलोणे, ओबीसी नेते अशोक जीवतोडे, कॉंगेसचे माजी नगर सेवक नंदु नागरकर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष बंडू हजारे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, दशरथसिंह ठाकूर, माजी महापौर अंजली घोटेकर यांच्यासह मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध धर्मीय आणि सर्व पक्षीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अमजद खान यांनी आभार प्रदर्शन तर प्रज्ञा जीवनकर यांनी संचालन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव