रत्नागिरी, 9 मे, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अगदी मान्सूनसारखा पाऊस कोसळला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तिन्ही दिवशी सकाळी आणि सायंकाळी तसेच पहाटेही पाऊस पडला.
गेले तीन-चार दिवस जिल्ह्यात सर्वत्र मळभ होते. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. रत्नागिरी शहर आणि परिसरासह तालुक्यातल्या अनेक ठिकाणी, तसेच राजापूर, संगमेश्वर, साखरपा, लांजा या ठिकाणी पाऊस पडला. त्यानंतर दिवसभर कडक ऊन पडत आहे. संध्याकाळी पुन्हा एकदा वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे आंबा बागायतदार आणि विक्रेते मात्र धास्तावले असून, हंगामाच्या अखेरीस आंब्याच्या दरांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी