हिंगोली : मयताच्या वारसांसाठी विशेष सहायता शिबीरात 94 अर्ज प्राप्त
हिंगोली, 6 एप्रिल (हिं.स.)। वसमत तालुक्यातील गुंज येथे आज खासदार नागेश पाटील आष्टीकर, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा ल
हिंगोली : मयताच्या वारसांसाठी विशेष सहायता शिबीरात 94 अर्ज प्राप्त


हिंगोली, 6 एप्रिल (हिं.स.)।

वसमत तालुक्यातील गुंज येथे आज खासदार नागेश पाटील आष्टीकर, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ९४ अर्ज विशेष‌ सहाय्यता शिबिरात भरून घेण्यात आले.

ही दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मयतांच्या वारसांना तात्काळ मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी माचेवाड आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मयतांच्या वारसांचे पुनर्वसन करण्याकरिता विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष सहायता शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सामाजिक अर्थ सहाय्य, घरकुल योजना यासह विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारे उत्पनाचे प्रमाणपत्र काढण्यासाठीचे 94 अर्ज भरुन घेण्यात आले. हे सर्व अर्ज संध्याकाळपर्यंत ऑनलाईन करुन प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित पीडितांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना, घरकुल योजना यासह शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी तालुका महसूल प्रशासनाकडून धान्य व इतर साहित्याचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड, नायब तहसीलदार अशोक भोजने, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता गजानन नांदे उपस्थित होते.

गुंज येथील शेतमजूर नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शेतीकामासाठी ट्रँक्टर ट्रॉलीतून जात असताना विहिरीत पडून सात महिलांचा मृत्यू झाला होता. राज्य शासनाने त्यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेतली असून, या शिबिराच्या माध्यमातून वारसांना विविध प्रमाणपत्रे, योजनांचा लाभ देण्यात येत आहे. मयतांच्या वारसाला राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 तर केंद्र शासनाकडून 2 लक्ष रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande