मुंबई, 6 एप्रिल, (हिं. स.) : प्रतिभा, आशयघनता आणि रचनात्मकता यांना चालना देण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये येत्या ३० एप्रिलला समाजमाध्यम साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
गेले दशकभर समाजमाध्यमांनी क्रांती केली आहे. कोणत्याही माध्यमाचा असतो, तसा या माध्यमाचासुद्धा विधायक कार्यासाठी उत्तम उपयोग होऊ शकतो. एकीकडे समाजमाध्यमातून देश-विदेशातील लोक व ज्ञान अगदी आपल्या घरात पोहोचत आहे, तर दुसरीकडे आसपासच्या नात्यांमध्ये दुरावा येत चालला आहे. अनेकदा हे आभासी जग व वास्तविक जग एकमेकांपासून पुष्कळ दूर गेलेले दिसते. या दोन्ही जगांचा उत्तम मेळ घालता आला, तर काय किमया घडू शकतो, याचा अनुभव घेण्यासाठी, वैचारिक देवाणघेवाण आणि गप्पा यांसाठी समाजमाध्यम साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
याच्या संयोजनात सुप्रसिद्ध नाटककार व कादंबरीकार, अभिराम भडकमकर आणिसमाज माध्यमांवरील लोकप्रिय लेखक, ओंकार दाभाडकर यांचे सहकार्य लाभले आहे. प्रबोधिनीच्या निसर्गरम्य परिसरात होणाऱ्या संमेलनात या व अन्य अनुभवी विषय तज्ज्ञ आणि समाज माध्यमांवरील सुप्रसिद्ध साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभेल.
समाजमाध्यमांवर ललित लेखन करणारे, समाजमाध्यमांवर प्रामुख्याने वैचारिक आशय निर्मिती करणारे यांच्यासाठी हे संमेलन आहे. यातून समाजमाध्यमांवरील लेखनाची पूर्वतयारी, समाज माध्यमांवरील लेखनाच्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्न, समाजमन घडताना, घडविताना अनुभविणे स्व-उत्कर्ष यांचा लाभ संमेलनातून होऊ शकेल.
संमेलन ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होईल आणि १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता संमेलनाचा समारोप होईल. मराठी माध्यमातून होणाऱ्या संमेलनाला जास्तीत जास्त १०० जणांना प्रवेश दिला जाईल. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (ज्ञान नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर-पश्चिम, जि. ठाणे) येथील निसर्गरम्य परिसरातील उत्तम निवास आणि भोजन व्यवस्थेसह संमेलनाचे शुल्क पाचशे रुपये आहे. इच्छुकांनी खालील लिंकवर नावनोंदणी करावी: https://rmponweb.org/sssammelan/ अधिक माहितीसाठी अनिल (९९७५४१५९२२) किंवा विनय (९०९६५४८२५०) यांच्याशी संपर्क साधावा.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी