
अमरावती, 29 जानेवारी (हिं.स.) : अमरावतीशहरासह इतरही ठिकाणी घरफोड्या करुन पोलिसांना आव्हान देणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी २८ जानेवारीला पकडले. त्याने शहरातील दहा चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. या चोरट्याकडून पोलिसांनी २० लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ११० ग्रॅमचे १८ लाख १५ हजारांचे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांनी पंकज राजु गोंडाणे (२८, रा. चवरेनगर, अमरावती), सागर जनार्धन गोगटे (३०, रा. गांधीचौक, अमरावती) या दोघांना अटक केली. पंकज गोंडाणे हा चोऱ्या, घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र तो गुन्हे केल्यानंतर शहरात थांबत नव्हता. रात्री दरम्यान चोरी केली कि, तो शहर सोडून मुंबई, ठाणे, संभाजीनगर, भुसावळ, कल्याण शहरात जाऊन आश्रय घेत होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांसाठी अवघड झाले होते. दरम्यान २७ जानेवारीला रात्री पंकज गोंडाणे कल्याण येथून रेल्वेने नागपूरला जाणार आहे, ही माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, एपीआय महेश इंगोले व त्यांच्या पथकाला मिळाली होती. या आधारे पीआय चव्हाण यांनी एपीआय इंगोले व त्यांच्या पथकाने पंकजला पकडण्यासाठी सूचना दिल्या . त्या आधारे पथक अमरावतीवरुन भुसावळला पोहोचले. पोलिसांनी पंकज गोंडाणे ज्या रेल्वेने प्रवास करत होता. त्या रेल्वेमध्ये जाऊन त्याचा शोध घेतला. त्यावेळी सुरूवातीला तो पोलिसांना दिसला नाही. पोलिसांनी भुसावळपासून रेल्वेचे डबे तपासले. बडनेरा रेल्वेस्थानकापासून नागपूरच्या दिशेने मालखेड येथे पंकज गोंडाणे एका आरक्षित डब्यात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी केली असून, त्याने शहरात दहा घरफोड्यांची कबुली दिली.
चोरीतील काही सोन्याचे दागिने त्याने त्याचा मित्र सागर गोगटेजवळ दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सागर गोगटेलाही ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलिसांनी ११० ग्रॅम सोने १ लाख ९० हजारांची ५०० ग्रॅम चांदी, ६८ हजार असा २० लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अशी माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली आहे. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पंकज गोंडाणे याच्याकडून तुर्तास दहा गुन्हे उघड झाले आहे. तपासात त्याच्याकडून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्या दिशेने आमचा तपास सुरू आहे. संदीप चव्हाण, पीआय, प्रमुख गुन्हे शाखा.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी