अमरावती : पिंपळोदमधून 1300 पाकिटे एचटीबीटी जप्त
अमरावती, 2 जून (हिं.स.) दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद गावात अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या
पिंपळोदमधून 1300 पाकिटे एचटीबीटी जप्त:


अमरावती, 2 जून (हिं.स.)

दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद गावात अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली. त्यावेळी एका व्यक्तीच्या घरातून तब्बल १३ लाख रुपयांच्या १३०० बॅग अनधिकृत प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे जप्त करण्यात आले.

पिंपळोद येथील प्रशांत नवलकर यांच्या घरात मोठ्या प्रमाणात एचटीबीटी बियाणे असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. शिवाय नवलकर या बियाण्यांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यामुळे पथकाने रविवारी दुपारी पिंपळोद गाठले. नवलकरकडे एचटीबीटी बियाणे असून त्याची विक्री करत असल्याची खात्री पटताच पथकाने नवलकरच्या घरी जाऊन झडती घेतली. त्यावेळी कृषी विभागाच्या पथकाला जवळपास १३०० पाकिटे मिळून आली. जप्त केलेल्या या पाकिटांची किंमत सुमारे १३ लाख रुपये आहे. शिवाय या पाकिटावर कोणतेही नाव नाही. त्यामुळे हे बियाणे कुठून विक्रीसाठी आणले, हे तूर्तास समोर आले नाही. मात्र, जिल्ह्यात यंदा झालेल्या सहा कारवायांमध्ये जप्त केलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा हा गुजरातमधून झालेला आहे. त्यामुळे हे बियाणेसुद्धा गुजरातमधूनच आले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी कृषी विभागाकडून पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande