गुजरातमधून आलेले 2500 पाकीट‎ अनधिकृत एचटीबीटी बियाणे जप्त‎
अमरावती, 2 जून (हिं.स.) गुजरातमधील अहमदाबाद येथून अमरावतीमार्गे नागपूरला जाणाऱ्या खासगी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे येथील वेलकम पॉइंटवर सापळा रचून त्या बस
गुजरातमधून आलेले 2500 पाकीट‎अनधिकृत एचटीबीटी बियाणे जप्त‎, खासगी बसद्वारे नागपुरात जाणार होती 25 लाखांची खेप‎


अमरावती, 2 जून (हिं.स.)

गुजरातमधील अहमदाबाद येथून अमरावतीमार्गे नागपूरला जाणाऱ्या खासगी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे येथील वेलकम पॉइंटवर सापळा रचून त्या बसची तपासणी केली असता २५ लाखांचे तब्बल अडीच हजार पाकिटे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे मिळून आले. हे बियाणे कृषी विभागाच्या पथकाने जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विभागाच्या पथकाने माहितीवरून वेलकम पॉइंटवर सापळा रचला. या वेळी अहमदाबादहून आलेल्या एका बसची तपासणी केली असता बसच्या खालील बाजूला असलेल्या डिकीत एचटीबीटीच्या अडीच हजार पाकिटांचा साठा आढळला. हा माल अहमदाबादेतील ॲग्रो सिड्स नामक कंपनीकडून नागपूर येथील अमितभाई या व्यक्तीच्या नावे जात असल्याचे समोर आले. तसेच ६४०० प्रिंट केलेले रिकामे प्लास्टिक पॅकेट होते, ते अहमदाबाद येथील साई क्रिएशनकडून नागपुरातील राजू भारमासेकडे जात असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत समोर आले. पथकाने त्या बसच्या चालकाकडे विचारणा केली, त्यावेळी त्याने एक लिफाफा त्यांना दिला. हा लिफाफा ज्या ठिकाणी माल उतरणार होता, त्याच ठिकाणी द्यायचा आहे, असे त्याने सांगितले. त्या लिफाफ्यावर माल कुठून आला व कोणासाठी आला हे नमुद होते. याच लिफाफ्यावरील माहितीच्या आधारे ॲग्री सिड्स, साई क्रिएशन, अमित भाई, राजू भारमासे ही नावे समोर आली. मात्र, प्रत्यक्ष त्यांचा संबंध यात आहे का हे पोलिस तपासात समोर येईल. दरम्यान जप्त केलेल्या या एचटीबीटी बियाण्यांची किंमत २५ लाख रुपये आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, एसएओ राहुल सातपुते यांच्या मार्गदर्शनात तंत्र अधिकारी (गुण नियंत्रक) राजेश जानकर, श्रीकांत नागे आणि प्रदीप वानखडे यांनी केली.

दरम्यान, जप्त केलेल्या या पाकिटांवर कोणत्याही निर्मात्याचे नाव नाही, बॅच क्रमांक नाही, एमआरपी नाही. मागील महिनाभरात कृषी विभागाच्या पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिबंधित अनधिकृत एचटीबीटीच्या एकूण सहा कारवाया केल्या आहेत. यापूर्वी ५०, १०० पाकिटांच्या वर माल मिळाला नव्हता. आजची कारवाई मात्र मोठी आहे. विशेष म्हणजे रविवारी जप्त केलेले अडीच हजार पाकिटे तथा यापूर्वीच्या पाच कारवायांत जप्त केलेला अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांचा माल हा गुजरातमधूनच आल्याचे समोर आले होते. यावरून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात एचटीबीटी बियाण्यांची निर्मिती झाल्याचे स्पष्ट होत आहे.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande