अमरावती, 9 मे (हिं.स.)
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार यांच्या पुढाकाराने तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडी केंद्रांना सिलिंडर व शेगडीचे वितरण करण्यात आले. या वितरणामुळे हा तालुका धूरमुक्त बनला असून, जिल्ह्यात तसा बहुमान मिळवणारा तो पहिला तालुका ठरला आहे.
पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत एकूण १६५ अंगणवाड्या संचालित केल्या जातात. या सर्व अंगणवाडी केंद्रांना ग्रामपंचायतीने त्यांच्या उत्पन्नातील १० टक्के रक्कम महिला व बाल विकास यांच्या कल्याणासाठी राखीव ठेवायला सांगितली आहे. तसा राज्य शासनाचा नियमही आहे. या राखीव निधीतूनच सर्व अंगणवाडी केंद्रांना सिलिंडर व शेगडी पुरवण्यात आली. दरम्यान प्रत्येक अंगणवाडी केंद्राला गॅस सिलिंडर आणि शेगडी संचाचे वाटप केल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुका हा जिल्ह्यातील पहिला धूरमुक्त अंगणवाडी असलेला तालुका म्हणून गौरवण्यात आला आहे. याचे श्रेय बीडीओ डॉ. स्नेहल शेलार, सहायक गटविकास अधिकारी संजय झंझाड, पं. स.चे अधिकारी, कर्मचारी आणि निधी राखून महिला व बालविकासाला हातभार लावणारे तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व ग्रा. पं. अधिकारी यांना जाते.
पं. स. अंतर्गत एकूण १२९ गावे असून ६८ ग्रा. पं.च्या कार्यक्षेत्रातत एकूण १६५ अंगणवाडी केंद्र आहेत. ग्रा. पं.ची कर वसुली करून त्यामध्ये महिला व बालकांचे कल्याण या अंदाजपत्रकावरील बाबीनुसार सर्व अंगणवाडी केंद्रांना गॅस सिलिंडर आणि शेगडी संचाचे वाटप करण्याचे शिस्तबद्ध नियोजन विठ्ठल जाधव व नीलेश ठाकरे या दोन विस्तार अधिकाऱ्यांनी केले आहे. या सर्व ग्रा. पं.ना मासिक सभा ठरावाद्वारे अंगणवाडी केंद्रातील लहान बालकांना आहार शिजवताना चुलीमुळे धुराचा त्रास होत होता. त्यामुळे सर्व अंगणवाड्या धूरमुक्त करण्याबाबत जाणीव जागृती करण्यात आली. त्यानंतर ग्रा. पं.ची राखीव १० टक्के रक्कम महिला व बालकल्याण निधी अंतर्गत ठेवण्यात आली. या यशस्वी कामकाजासाठी सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रा. पं. अधिकारी यांनी योगदान दिले. या सर्वांचे बालविकास विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी