अमरावतीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
अमरावती, 21 जानेवारी (हिं.स.) : अमरावती महापालिकेचे नवे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, याकडे सध्या सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी ‘४४ मॅजिक फिगर’ जुळविण्या
अमरावतीत भाजप, युवा स्वाभिमान व मित्रपक्षांची होणार सत्ता स्थापन सत्ता स्थापनेसाठी '४४ मॅजिक फिगर' जुळविण्यासाठी जोर


अमरावती, 21 जानेवारी (हिं.स.) : अमरावती महापालिकेचे नवे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, याकडे सध्या सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी ‘४४ मॅजिक फिगर’ जुळविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

अमरावती महापालिकेच्या २२ प्रभागांतून एकूण ८७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजप २५, युवा स्वाभिमान पक्ष १५, काँग्रेस १५, एमआयएम १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ११, शिंदेसेना ३, बसपा ३, उद्धवसेना २ आणि वंचित बहुजन आघाडीचा १ नगरसेवक आहे.

महायुतीत महापौरपद भाजपच्या वाट्याला येण्याचे संकेत मिळत असले, तरी आरक्षण आणि रोटेशननुसार यावेळी महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव राहण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम रणनीती आरक्षण जाहीर झाल्यानंतरच ठरणार आहे.

१० मार्च १९९२ ते ८ मार्च २०२२ या ३० वर्षांच्या कालावधीत अमरावती महापालिकेत १६ महापौरांनी कामकाज सांभाळले आहे. मात्र, ९ मार्च २०२२ पासून आतापर्यंत महापालिकेत प्रशासक राजवट सुरू आहे.

भाजप, युवा स्वाभिमान पक्ष आणि मित्रपक्षांची सत्ता स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे यांच्यासह स्थानिक नेते महापौर भाजपचाच व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

दुसरीकडे, काँग्रेसनेही सत्तास्थापनेच्या दिशेने पावले टाकली असून एमआयएम, राष्ट्रवादी (अजित पवार), बसपा आणि उद्धवसेना गटाशी चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. मागील दोन दिवसांपासून बैठकींचे सत्र वाढले असून ‘४४ मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत.

आता अमरावतीच्या राजकारणाची दिशा महापौरपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर होते, यावरच ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande