तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडला
अमरावती, 21 जानेवारी (हिं.स.)। तीन-साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दराने अखेर उसळी घेतली आहे. जिल्ह्यासह राज्यातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर ५,१०० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच सोयाबी
तीन वर्षांनंतर सोयाबीन पाच हजारी; वाढलेल्या भावांचा खरा लाभ कुणाला?  75 टक्के शेतकऱ्यांकडे साठवणूकच नाही


अमरावती, 21 जानेवारी (हिं.स.)। तीन-साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दराने अखेर उसळी घेतली आहे. जिल्ह्यासह राज्यातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर ५,१०० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे.

हमीभाव योजनेंतर्गत 'नाफेड'कडून जिल्ह्यात १६ केंद्रांवर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. येथे ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र, खासगी बाजारात सोयाबीनच्या दराने उसळी घेतल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. नाफेड आणि खासगी व्यापाऱ्यांचे दर १०० ते २०० रुपयांचे दरम्यान कमी-अधिक आहे. त्यामुळे केंद्रापेक्षा खासगी बाजारात शेतकरी आपला माल आणत आहेत. अशा परिस्थितीत 'डीओसी'ची मागणी वाढली, शिवाय सरकी देखील महागली. त्यामुळे सोयाबीनला उठाव आला.

अमेरिका, ब्राझील आणि अर्जेटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांमध्ये हवामानातील बदल, उत्पादन अंदाजात घट आणि निर्यातीवरील मर्यादा यामुळे जागतिक बाजारात दर वाढल्याचे बोलले जात आहे शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यावर झाली दरवाढ आर्थिक अडचणीमुळे ७० ते ७५ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन आधीच विकून टाकले आहे. आता केवळ मोठ्या शेतकऱ्यांकडे थोडाफार साठा शिल्लक असताना दरवाढ झालेली आहे. वाढलेल्या भावांचा खरा लाभ कुणाला? असा संतप्त शेतकरी प्रश्न विचारत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande