
अमरावती, 21 जानेवारी (हिं.स.) :
भाजपमधील अंतर्गत घमासान आता अफवांच्या पातळीवर पोहोचले असून, मंगळवारी दुपारी सोशल मीडियावर भाजप नेते प्रविण पोटे यांनी राजीनामा दिल्याची अफवा जोरदारपणे पसरवण्यात आली. मात्र, प्रविण पोटे मित्र परिवाराने या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार, भाजपमधील अंतर्गत वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. एकीकडे तिकीट वाटपावरून कोअर कमिटीवर थेट टीका होत असताना, दुसरीकडे प्रविण पोटे यांना आमदार दाम्पत्याचे निकटवर्तीय ठरवून सोशल मीडियावर विविध पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. हे प्रकरण शांत होत नाही तोच, प्रविण पोटे यांच्या राजीनाम्याची अफवा पुन्हा एकदा वेगाने पसरली.
ही बातमी व्हायरल होताच सत्यता जाणून घेण्यासाठी प्रविण पोटे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मला पक्षातील ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच इतर वरिष्ठ नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमीच एकत्रित प्रयत्न करत आलो आहे.”
पुढे बोलताना त्यांनी ठाम शब्दांत म्हटले की, “ज्यांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे, तेच अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता होतो, आहे आणि कायम राहीन.” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने वेळीच ठोस निर्णय न घेतल्यास, अशा अफवा आणि घडामोडी पक्षाच्या प्रतिमेला मारक ठरण्याची तसेच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी