
अमरावती, 21 जानेवारी (हिं.स.)। मेळघाट आणि अचलपूर परिसरातील आदिवासी व अन्य समाजबांधवांनी शासनाला मका पीक विकून आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप या पिकाचा मोबदला शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही. हक्काचे पैसे मिळत नसल्याने या भागातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, मका पिकाचे चुकारे केव्हा मिळणार, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
या गंभीर समस्येबाबत मेळघाटचे सामाजिक कार्यकर्ते व गाभा समिती सदस्य अॅड. बंड्या साने यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मुख्य सचिवांसह अनेक वरिष्ठ विभागांना लेखी पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. हमीदराने शासन खरेदीसुरु करण्यासाठी मेळघाटातील सामाजिक कार्यकर्त्यासह शेतकऱ्यांनी लढा दिला होता. त्यानंतर मक्याची खरेदी सुरु झाली होती. हे येथे उल्लेखनीय.
प्रशासकीय दिरंगाईने आदिवासी शेतकरी त्रस्त
शासकीय खरेदी केंद्रावर मका दिल्यानंतर ठरावीक काळात पैसे मिळणे अपेक्षित असते. मात्र, दोन महिने झाले तरी आदिवासी विकास महामंडळ किंवा संबंधित विभागाकडून पेमेंट मिळालेले नाही. मेळघाटातील गरीब शेतकरी या पैशांवरच आपल्या पुढच्या हंगामाचे नियोजन आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी