सांगली, 9 मे (हिं.स.)।
खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळीच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हावीत. यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2025 आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झाली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. बोगस खते, बी-बियाणे याबाबत कृषी विभागाने सातत्याने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करून धाक निर्माण करावा. बोगस खते, बियाणांची विक्री होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. गत वर्षातील बोगस खते व बियाणे बाबत अंतिम कारवाई काय केली झाली याबाबत सविस्तर माहिती द्यावी. विविध योजनांच्या लाभासासाठी शेतकरी ओळखपत्राचे महत्व खूप आहे, ते शेतकऱ्यांना पटवून सांगावे व त्यानुसार सर्व शेतकऱ्यांचे ओळखपत्र काढण्यासाठी कार्यवाही करावी. पीक विम्याबाबत कृषी विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कृषी विभागाने नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांची ओढ व्हावी यासाठी एक गाव पूर्णपणे नैसर्गिक शेतीसाठी निवडावे. त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ व उत्पादनात झालेल्या तुटीसाठी त्यांना अर्थसहाय्य देऊ, असे ते म्हणाले.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर व आमदार सत्यजित देशमुख यांनी विविध सूचना केल्या. यावर कृषी विभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, खरीप हंगामासाठी चांगली बियाणे, खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. बोगस बियाणे, खते विकली जाणार नाहीत याची दक्षता घेऊ असे ते म्हणाले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अभयसिंह चव्हाण यांनी खरीप हंगाम 2025 नियोजनाबाबत सविस्तर सादरीकरण केले.
सांगली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर असून, त्यापैकी निव्वळ पिकाखालील क्षेत्र 5 लाख 76 हजार 903 हेक्टर आहे. खरीप हंगामाकरीता एकूण 28 हजार 501 क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून ते 15 मे नंतर उपलब्ध होईल. खरीप हंगामाकरीता 1 लाख 94 हजार 293 मेट्रीक टन खताची मागणी केलेली आहे. मार्च अखरे जिल्ह्यामध्ये 66 हजार 708 मेट्रीक टन शिल्लक साठा असून आजअखेर 14 हजार 217 मेट्रीक टन रासायनकि खताचा पुरवठा झालेला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने