रत्नागिरी, 9 मे, (हिं. स.) : कोतवडे गावची स्वयंभू आणि जागृत ग्रामदेवी श्री महलक्ष्मीदेवी मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात करण्यात आला.
नूतन मंदिराच्या कलशांची शोभायात्रा कोतवडेवासीयांनी उत्साहात काढली. चित्ररथ, पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करत ग्रामस्थ मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभागी झाले होते. श्री महालक्ष्मी मंदिरापासून ते सनगरेवाडीमधील चिखलबावपर्यंत आणि पुन्हा मंदिरापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेत ठिकठिकाणी भगवे ध्वज घेऊन ग्रामस्थ सहभागी झाले होते. प्रत्येक वाडीतील महिला आणि पुरुषांनी समान परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले. शोभायात्रेच्या प्रारंभी ढोलपथक होते. उंबरवाडीतील ग्रामस्थांनी वाघासह देवी असलेला चित्ररथ साकारला होता, तसेच उंबरवाडीतील महिलांचे लेझीम पथक शोभायात्रेत सहभागी झाले होते. कुंभारवाडीतील ग्रामस्थांनी संत गोरा कुंभार आणि श्री विठ्ठलाची प्रतिमा असलेला विशेष चित्ररथ साकारला होता. गावणवाडी येथील महिला डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. सनगरेवाडीतील ग्रामस्थांनीही चित्ररथ साकराला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभु श्रीराम यांची वेशभूषेत शोभायात्रेचे आकर्षण ठरले.
सकाळी साडेसहा वाजल्यापासून मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. गावणवाडीमधील ग्रामस्थांनी मंदिराच्या मुख्यद्वाराला तोरण बांधले. मंदिराला फुलांनी सजवणे, रांगोळी घालणे, धार्मिक विधींची सिद्धता करणे आदी विविध सेवांमध्ये गावातील सर्व वाड्यांमधील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सकाळी मंदिरामध्ये संप्रोक्षणविधी झाला. सायंकाळी राक्षोघ्नयाग झाला. वेदमूर्ती प्रभाकर जोगळेकर, मंदार घारपुरे, विजयानंद वझे आदी पुरोहितांनी मंदिरांतील सर्व धार्मिक विधी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी