परभणी - ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीद्वारे खेळाडूंना 5 टक्के आरक्षणासाठी प्रमाणपत्र उपलब्ध
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील 5 टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक व जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित
परभणी - ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीद्वारे खेळाडूंना 5 टक्के आरक्षणासाठी प्रमाणपत्र उपलब्ध


परभणी, 13 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील 5 टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक व जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

या प्रणालीमध्ये ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार होण्याची शक्यता नसल्यामुळे बनावट प्रमाणपत्रांना पूर्णतः आळा बसणार आहे. खेळाडूंनी माहिती भरल्यानंतर मूळ डेटाशी पडताळणी होऊन अवघ्या 24 तासांत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. तसेच प्रत्येक प्रमाणपत्रावर अद्वितीय क्यूआर कोड देण्यात येत असून संबंधित नियुक्ती प्राधिकरण (उदा. एमपीएससी, पोलीस भरती) यांना प्रमाणपत्राची सत्यता त्वरित तपासता येणार आहे.

आगामी शासकीय पदभरतीसाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर शासकीय भरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंनी या प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही.

ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतली आहे, त्यांनीही शासकीय किंवा निमशासकीय भरतीसाठी अर्ज करताना या प्रणालीद्वारे डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे.

खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ https://sports.maharashtra.gov.in येथे जाऊन नोंदणी करावी. संकेतस्थळावरील ‘Our Services’ या विभागात ‘5% Reservation’ या पर्यायावर क्लिक करून नोंदणी पूर्ण करता येते. नोंदणीसाठी आधार-संलग्न मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्डाची पीडीएफ प्रत तसेच क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्रावीण्याचे प्रमाणपत्र (पीडीएफ) अपलोड करणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध नसल्यास ‘Grievance’ पर्यायाद्वारे अर्ज करता येतो किंवा support@kridaepramaan.org या ई-मेलवर तक्रार नोंदविता येते. त्यासाठी स्पर्धेचे अचूक नाव व वर्ष नमूद करणे तसेच उपलब्ध मूळ क्रीडा प्रमाणपत्राची स्कॅन प्रत जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन, जूडो व कुश्ती या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाइन उपलब्ध असून संबंधित खेळाडूंनी तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी गीता साखरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande