अमरावती, 9 मे (हिं.स.)अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश काळबांडे यांचे सहकार महर्षी बापूसाहेब काळबांडे शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था अमरावतीचे सभासदत्व रद्द करण्याच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर उच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. त्यामुळे प्रकाश काळबांडे यांचे मुळ संस्थेवरील सभासदत्व कायम असल्याने त्यांच्या संचालपदावर आलेला धोका टळला आहे. हायकोर्टाने दिलेल्या स्टे ऑर्डरची प्रत काळबांडे यांनी जिल्हा बँकेकडे पाठविली असून त्यांचे संचालकपद देखील त्यामुळे कायम राहणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी मनमर्जी तसेच गैरकारभाराविरोधात सभागृहात सातत्याने परखडपणे बोलणारे प्रकाश काळबांडे यांच्या विरोधाला दाबण्यासाठी सत्ताधारीगटातील काही संचालकांनी त्रयस्थ व्यक्तींच्या मार्फत प्रकाश काळबांडे यांच्याविरोधात त्यांचे सभादत्व तसेच जिल्हा बँकेचे संचालकपद रद्द करण्यासाठी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावर सहकारी कोर्टात दबाव आणून प्रकाश काळबांडे यांचे सहकार महर्षी बापूसाहेब काळबांडे शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय उपजिल्हा सहकारी निबंधक तसेच त्यानंतर विभागीय सहनिबंधक यांनी दिला होता. सदर निर्णयाविरोधात प्रकाश काळबांडे यांनी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी हायकोर्टासमोर तक्रारकर्त्या व्यक्तीचा सदर संस्थेशी कुठलाही संबंध नसल्याचे उघड झाले असून संबंध नसताना प्रकाश काळबांडे यांच्या संस्थेच्या अंतर्गत विषयात तक्रारी करून त्यांच्याविरोधात तक्रारी करण्याच्या विषयाला हायकोर्टाने फटकारले आहे. यामध्ये काळबांडे यांच्या वकिलांनीविठ्ठलनगर सहकारी गृहनिर्माण संस्था, मुंबई विरुद्ध विभागीय संयुक्त निबंधक, सीएसएमडी आणि इतर २०१५ (२) एमएच.एल.जे. ४५२ या केसचा उल्लेख करत बाहेरील व्यक्तींना तक्रारी करण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यावर हायकोर्टाने प्रकाश काळबांडे यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या उपजिल्हा सहकारी निबंधक तसेच विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या सर्व प्रकारच्या आदेशांना एकाच वेळी रद्द करून प्रकाश काळबांडे यांचे सभासदत्व कायम ठेवण्यास १५ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशाद्वारे सांगितले आहे. त्यामुळे प्रकाश काळबांडे यांचे मुळ संस्थेवरील सभासदत्व हायकोर्टाने कायम ठेवल्याने त्यांचे जिल्हा बँकेवरील संचालकपद देखील कायम असणार आहे. या प्रकरणी कोर्टासमक्ष प्रकाश - काळबांडे यांच्या वतीने अॅड. निलेश काळवाघे तसेच अॅड धनंजय राऊत यांनी बाजू मांडली.
आदेशाची प्रत बँकेला पाठवली - प्रकाश काळबांडे
हायकोर्टाने माझे मुळ संस्थेवरील सभासदत्व रद्द करण्याच्या सर्व प्रकारच्या निर्णयांना स्थगिती दिली असून त्यामुळे माझे सभासदत्व कायम आहे. सदर आदेशाची प्रत मी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच सीईओंना पाठविली आहे. बँकेतील भ्रष्टाचाराविरोधात मी परखडपणे बोलत असल्याने माझ्याविरोधात विरोधकांनी रचलेले हे कारस्थान होते. त्याला हायकोर्टाच्या आदेशामुळे चपराक बसली आहे असे प्रकाश काळबांडे यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी