नाशिक, 9 मे (हिं.स.)।
प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ होत असून सद्यस्थितीत १०८ टँकर सुरु करण्यात आले आहेत. १ लाख ९७ हजार ५६६ लोकसंख्येसाठी २२९ टँकरच्या फेऱ्या मंजुर झाल्या असून आतापर्यंत २२६ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उशिराने टँकर सुरु झाले असले तरी समाधानकारक पाऊस झाल्याने टँकर सुरु करण्याची नामुष्की येणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, प्रशासनाच्या नियोजन अभावामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी चारीदिशा भटकंती करावी लागत आहे.
जिल्ह्यातील ११६ गावे आणि २३६ वाड्यांची तहान भागविण्यासाठी १० शासकीय आणि ९८ खासगी टँकर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या टँकरसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी ४८ विहीरी तर गावे आणि वाड्यांना पाणी पुरविण्यासाठी १५ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान कळवण तालुक्यामध्ये टँकर सुरु नसले तरी ६ गावे आणि २ वाड्यांसाठी दोन विहीरी कर टँकरसाठी ६ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पाणवठे कोरडेठाक पडत चालल्याने वेळेत पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील शेतीवर दूष्काळाचे ढग गडत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांमधील शिल्लक पाणीसाठ्याचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI