अमरावती, 9 मे (हिं.स.) अमरावतीच्या इस्कॉन मंदिरात २५ व्या ब्रह्मोत्सवानिमित्त श्री रुक्मिणी द्वादशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी व कीर्तन सम्राट लोकनाथ स्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ४.३० वाजता श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांच्या शुभमंगल आरतीने होईल. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा सामूहिक जप होणार आहे. लोकनाथ स्वामी महाराज श्री रुख्मिणी कथेचे कथन करतील. सकाळी ७.३० वाजता दर्शन आरती व गुरुपूजा होईल.
सायंकाळी ६ वाजता संकीर्तनासह श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांचा महाअभिषेक होईल. इस्कॉन भक्त प्रल्हाद स्कूलच्या विद्यार्थी श्री रुख्मिणी जन्मोत्सवावर आधारित नाटिका सादर करतील.
११ मे रोजी श्री नृसिंह चतुर्दशी महोत्सव साजरा होणार आहे. या दिवशी पहाटे ४.३० पासून विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सायंकाळी ६ वाजता श्री श्री लक्ष्मी नृसिंह व प्रल्हाद यांचा महाअभिषेक वरिष्ठ ब्रह्मचारी भक्तांद्वारे होईल. भक्त प्रल्हाद स्कूलचे विद्यार्थी श्री नृसिंह प्रागट्य लीलेवर आधारित नाटिका सादर करतील. श्रीमान अनंतशेष प्रभुजी श्री नृसिंह प्रल्हाद कथा सांगतील. ५६ भोग दर्शन व महाआरतीनंतर दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांची सांगता महाप्रसादाने होईल.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी