सोलापूर, 9 मे (हिं.स.)।
उजनी धरण उणे २८ टक्के होईपर्यंत डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडता येते. पण, धरण उणे १० टक्क्यांवर पोचताच पाण्याचा वेग कमी होतो. दरम्यान, १ मे रोजी उजनी धरण उणे १५ टक्के असताना कॅनॉलमधील विसर्ग २५४० क्युसेक इतका होता. आता धरण उणे २० टक्के झाल्याने कॅनॉलमधील विसर्ग १ हजार ९५० क्युसेकपर्यंत खाली आला आहे. शेतीसाठी उजनीतून सोडलेले पाणी २५ मेपूर्वीच बंद होणार आहे.२९ डिसेंबर रोजी १०० टक्के भरलेले धरण सव्वाचार महिन्यातच उणे २० टक्क्यांवर पोचले आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात सलग दोन आवर्तने सोडल्याने १७ एप्रिलला धरण उणे झाले. सध्या धरणात जरी ५२ टीएमसी पाणी असले तरी ते सगळेच पाणी वापरता येत नाही. त्यात गाळ २० टीएमसीपर्यंत आहे. बाष्पीभवनातूनही दीड ते दोन टीएमसी पाणी जाणार आहे. अवकाळीमुळे पाऊस लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर २५ मे पूर्वी शेतीसाठी सोडलेले पाणी बंद करून त्यानंतर धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. सध्या धरणावर ४२ योजना आणि १०० हून अधिक ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड