सोलापूर, 9 मे (हिं.स.)।
जिल्हा परिषदेमध्ये सध्या सुधारणा होताना दिसत आहेत. बाग परिसर, रस्ते सुधारणा झाली आहे. कार्यालयात आत येताना सुद्धा अभ्यागतांना बैठक तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आता तर जिल्ह्यातून मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी कोणते कार्यालय कुठे आहे याची पहिल्यांदाच माहिती मिळणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेश दारातून आत आल्यानंतर समोरच कार्यालयांच्या नावासह दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. त्यामध्ये मुख्य इमारतीमध्ये असलेल्या सर्व कार्यालयांची माहिती आहे परंतु जिल्हा परिषदेचा आत्मा म्हणून ओळख असणारा ग्रामपंचायत विभाग यातून गायब आहे.
तब्बल साडेतीन वर्ष जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा कारभार पाहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांची राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ओएसडी पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नुकताच पदभार सोडला आहे. शेळकंदे झेडपीतून गेले आता त्यांचा विभाग ही झेडपीतून गायब झाला अशी मजेदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड