* मुंबईत आंतरराष्ट्रीय मत्स्यपालन तंत्रज्ञान प्रदर्शन
मुंबई, 12 जून (हिं.स.) - मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी ड्रोन तैनात करण्यापासून ते मत्स्यपालन विकास प्रकल्पांना गती देण्यापर्यंत, आम्ही एआय नवोपक्रम आणि जलद वाढीस पाठिंबा देणारी एक परिसंस्था तयार करत आहोत अशी माहिती राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुंबईत गोरेगाव येथे आयोजित दोन दिवसीय तंत्रज्ञान-आधारित मत्स्यपालन तंत्रज्ञान प्रदर्शन (आयएफटी) च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश नारायण राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, तसेच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा येथील राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना मंत्री राणे म्हणाले की , “आंतरराष्ट्रीय मत्स्यपालन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी तंत्रज्ञान, धोरण आणि क्षमता या तिन्ही गोष्टी एकाच छताखाली आणणारा खरोखरच जागतिक दर्जाचा मंच निर्माण केला आहे. ही योजना योग्य वेळी सुरू झाली आहे. महाराष्ट्र मत्स्यपालनात पहिल्या पाच राज्यांमध्ये येण्यासाठी कटिबद्ध आहे आणि अशा प्रकारची प्रदर्शने हा प्रवास गतिमान करण्यासाठी आवश्यक आहेत. मी तंत्रज्ञान पुरवठादार, गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपल्यासोबत भारताच्या मत्स्यपालन आणि जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी.” अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याव्यतिरिक्त, भारताच्या मत्स्यव्यवसाय सर्वेक्षण संस्थेचे महासंचालक श्रीनाथ के.आर. यांनी सांगितले की , “भारताचे मत्स्यपालन क्षेत्र जागतिक स्तरावर आपली छाप सोडत आहे - १३० हून अधिक देशांना निर्यात करत आहे आणि पायाभूत सुविधा व नवोपक्रमातील परिवर्तनकारी गुंतवणुकीमुळे हे शक्य झाले आहे. आयएफटी एक्स्पोसारखे मंच या गतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत, जे आपल्या पंतप्रधानांच्या शाश्वत, तंत्रज्ञान-आधारित नील अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाशी जुळणारी तंत्रज्ञाने प्रदर्शित करतात. असे सांगत या सहकार्यासाठी आणि विकासासाठी उत्प्रेरक (catalyst) निर्माण केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. ”
२०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मत्स्यपालन क्षेत्रासाठी विक्रमी ₹२,७०३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे भारताच्या मत्स्यपालन क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठीची कटिबद्धता अधोरेखित होते. याच पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी