
नागपूर, 04 फेब्रुवारी (हिं.स.) : नागपूर शहरातील खामला ते जयताळा मार्गावर (लंडन स्ट्रीट) विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिक आणि वकील ऍड. ज्ञानदीप भोंगाडे यांनी प्रशासकीय न्यायमूर्तींना पत्र लिहिले होते. पत्रातील मुद्द्यांचा गांभीर्य ओळखून न्यायालयाने हा विषय जनहित याचिकेच्या (सुमोटो) स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला.याप्रकरणी हायकोर्टाने ऍड. राहुल धांडे यांना न्यायालय मित्र (अम्यॅकस क्युरी) म्हणून नियुक्त केले असून, 2 आठवड्यांच्या आत याचिका सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ऍड. ज्ञानदीप भोंगाडे यांच्या पत्रानुसार, नागपूर महापालिकेने नेमकी किती झाडे तोडली आणि त्याऐवजी किती नवीन झाडे लावली, याची माहिती अद्याप सार्वजनिक केलेली नाही. प्रशासनाचे कर्तव्य असताना ही माहिती नागरिकांपासून लपवली जात असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. तसेच ही झाडे ही शहराची ‘फुफ्फुसे’ आहेत, आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. याचा थेट परिणाम सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेगाव तलावाच्या पाणीपातळीवर होण्याची शक्यता आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, वेळेत वृक्षारोपण व संवर्धन करण्यात अपयश आल्यास नागपूरला भविष्यात दिल्लीसारख्या गंभीर प्रदूषण समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खामला परिसरातील जुने वृक्ष अनेक दशकांपासून अस्तित्वात आहेत, परंतु प्रस्तावित ‘लंडन स्ट्रीट’ प्रकल्प व मॉलच्या बांधकामासाठी तोडले जात आहेत. गेल्या 37 वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या ऍड. भोंगाडे यांनी नमूद केले की, विकास प्रक्रियेत पर्यावरण पूर्णपणे बळी जात आहे. जुन्या मटण मार्केटच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली असून, त्याऐवजी नवीन वृक्षारोपणाचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी