मुंबई, 20 जून (हिं.स.)।१९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याला रोहित शर्मा याच्याकडून खास गिफ्ट मिळाले आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून दमदार पदार्पण करणाऱ्या आयुष म्हात्रे याने इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
आयुष म्हात्रेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रोहित शर्मासोबतचा एक फोटो शेअर केलाय. ज्यात तो बॅट हातात घेऊन रोहितसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसून येते. इंग्लंड दौऱ्यावर कॅप्टन्सीसाठी सज्ज असलेल्या या युवा क्रिकेटरला रोहित शर्मानं स्वाक्षरी केलेली बॅट भेट स्वरुपात दिलीये. एक बॅट, आशीर्वाद आणि आयुष्यभरासाठी अविस्मरणीय राहिल अशा खास क्षणासाठी धन्यवाद रोहित दा... अशा शब्दांत युवा क्रिकेटरनं हिटमॅन रोहित शर्मा याचे आभार मानले आहेत.
आयपीएलमध्ये खास छाप सोडल्यावर आयुष म्हात्रे आता इंग्लंड दौऱ्यात १९ वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. २४ जून ते २३ जुलै या कालावधीत भारतीय अंडर १९ संघ इंग्लंडमध्ये ५० षटकांच्या सराव सामन्यासह पाच सामन्यांची युथ वनडे सीरिजसह इंग्लंड अंडर १९ संघाविरुद्ध सामने खेळणार आहे.
आयपीएलच्या १८ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघात त्याची लेट एन्ट्री झाली. ६ सामन्यात त्याने १८७.२७ च्या स्ट्राइक रेटनं २०६ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात ९४ धावांची खेळी करत त्याने आपल्या भात्यातील धमक दाखवून दिली होती. आगामी काळात तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडूच्या रुपात दिसू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode