अकोला, 7 जून (हिं.स.)। बार्शीटाकळी तालुक्यातील बोरमळी-चेलगाव धरणात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. मृतकांची नावे योगेश आश्रुबा डाहाळे आणि कार्तिक कृष्णा डाहाळे असून दोघेही सुमारे १८ वर्षांचे होते. हे दोघे मित्र चिखलगाव येथील रहिवासी आहेत. उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळावा म्हणून ते धरण परिसरात गेले होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांनी पाण्यात उतरून थंडावा घेण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांना महाग पडला. खोल आणि प्रवाही पाण्यात काही क्षणांत दोघेही बुडाले आणि बेपत्ता झाले. घटनेनंतर आसपासच्या गावकऱ्यांनी आवाज ऐकून तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. या गंभीर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजेश वझीरे आणि पुनोती विभाग प्रमुख राजू पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तत्काळ पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला मदतीसाठी बोलावले. मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या या पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली मयूर सळेदार, शेखर केवट, अंकुश सदाफळे, विष्णु केवट, किशोर तायडे, शिवम वानखडे आणि सार्थक वानखडे यांनी वीस मिनिटांत घटनास्थळी दाखल होऊन शोध व बचाव साहित्यासह त्वरित सर्च ऑपरेशन सुरु केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर २० फूट खोल पाण्यात मृतदेह सापडले आणि त्यांना बाहेर काढण्यात पथकाला यश मिळाले. घटनेच्या वेळी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार धुमाळ, उपनिरीक्षक वारे व अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होते. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी देखील घटनास्थळी संपर्क साधून बचाव कार्याचे नियोजन केले. बोरमळीचे सरपंच आणि मृतकांच्या नातेवाईकांनी देखील घटनास्थळी उपस्थिती दर्शवली. या दुर्दैवी घटनेने चिखलगाव व आसपासच्या भागात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिक दुःख व्यक्त करत आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, खोल पाण्यात किंवा धरणात पोहण्यासाठी उतरताना नेहमी सावधगिरी बाळगावी आणि पोहण्याचे प्रशिक्षण घेतलेले नसेल तर अशा ठिकाणी जाणे टाळावे, कारण एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्यभरासाठी दुःख घेऊन येतो. या घटनेतून शिकण्यासारखे धडे समोर आले असून स्थानिक प्रशासन पुढील काळजीपूर्वक उपाययोजना करण्यासाठी वस्तीवासीयांना जलस्रोतांबाबत जागरूक करणार असल्याचे म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे