रत्नागिरी, 9 जून, (हिं. स.) : दक्षिण आफ्रिकेत काल (दि. ८ जून) पार पडलेल्या जागतिक कीर्तीच्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचे प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणचे डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी रत्नागिरीचा झेंडा फडकवला.
सुमारे ९० किलोमीटर अंतराची ही अल्ट्रा मॅरेथॉन या दोघांनीही सुमारे ११ तास ३० मिनिटांत पूर्ण केली. कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वांत जुनी व प्रतिष्ठित अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. स्पर्धेचे यंदाचे हे ९८ वे वर्ष होते. पिटर्समारीबर्ग ते डर्बन हे सुमारे ९० किलोमीटरचे अंतर १२ तासांच्या मर्यादेत पार करणे ही या स्पर्धेची अट होती. ५ अंश सेल्सियसपासून २२ अंश सेल्सिअसपर्यंतच्या बदलत्या तापमानात, खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून आणि अनेक चढ-उतार, अडथळे पार करत प्रसाद देवस्थळी आणि डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी कर्करोगावर मात केलेली असून, त्यांनी यापूर्वी दोन वेळा ‘आयर्नमॅन’ किताब पटकावला आहे. ही फिटनेसचा कस पाहणारी स्पर्धा असते. सायकलिंगमध्येही त्यांनी ‘सुपर रँडोनेअर’ हा मानाचा किताब मिळवला आहे.
प्रसाद देवस्थळी हे संगमेश्वर तालुक्यातील धामापूर गावचे सुपुत्र. 'धावनगरी रत्नागिरी' अशी ओळख प्रस्थापित करणारे देवस्थळी हे केवळ मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजक नाहीत, तर स्वतःही देशभरातील विविध मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नियमितपणे भाग घेत असतात. यंदा प्रथमच त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता ही स्पर्धा सुरू झाली आणि मजल दरमजल करत त्यांनी ती पूर्ण केली. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक तसेच कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक असलेल्या देवस्थळी यांचे लाइव्ह लोकेशन अनेक जण पाहत होते.
देवस्थळी यांचे रत्नागिरीत भव्य स्वागत करण्यात येणार असून, त्यात त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे कार्यकर्ते आणि शहरातील धावपटू सहभागी होणार आहेत. रत्नागिरीतून या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारे प्रसाद देवस्थळी हे बहुधा पहिलेच धावपटू असावेत. त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी