नाशिक, 1 जुलै (हिं.स.)। नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनच्या मान्यतेने आणि त्यांच्या आधीपथ्याखाली नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये वरिष्ठ गटाच्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची काल रात्री मोठ्या उत्साहात सांगता झाली. या स्पर्धेत महिलांमधे यजमान नाशिकच्या महिला संघाने अमरावती संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. तर पुरुषांमध्ये नागपूरच्या संघाने वर्धा संघावर विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.
नाशिकची कर्णधार राष्ट्रीय खेळाडू हंसीनी जाधव, प्रिया घरटे. वेदिका महाले, आदिश्री बिरारी, प्रतीक्षा महाले आणि दिया महाले यांचा समावेश असलेल्या नाशिकच्या महिला संघाने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत अंतिम लढतीत अमरावतीच्या संघावर प्रथमपासूनच दबाव राखत पहिला सेट २१-१४ असा जिंकून आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्येही नाशिकच्या संघाच्या खेळाडूंनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखत दुसरा सेटही २१- १७ असा जिंकून सरळ दोन सेटमध्ये विजय प्राप्त करून विजेतेपद आपल्या नांवे केले. याआधी झालेल्या उपांत्य लढतीत नाशिकच्या संघाने पुणे संघाचा असाच सरळ दोन सेटमध्ये पराभव केला होता. तर चुरशीच्या झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमरावती संघाने पहिला सेट १८-२१ असा गमावला. परंतु त्यानंतर दुसरा सेट २१-१३ तर तिसरा निर्णायक सेट २१- १७ असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या पुणे आणि सोलापूर या संघांना संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या गटामध्ये बलाढ्य नागपूरच्या संघाने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी वर्धा संघावर २-१ अशी मात करून विजेतेपद पटकावले. अत्यंत्य चुरशीच्या या अंतिम लढतीत नागपूर संघाने पहिला सेट २१- १६ अशा जिंकून आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये वर्धा संघाने चांगला संघर्ष करत हा सेट २१-१८ असा जिंकून १-१ अशा बरोबरी साधली. त्यानंतरही तिसऱ्या सेटमध्ये वर्धा संघाने ९-७ अशी आघाडी घेतली होती. . मात्र नागपूरच्या संघातील अमुभवी खेळाडूंनी संय्यमाने खेळ करत ही आघाडी मोडून काढत १६-१६ अशी बरोबरी साधली. त्यानंतरही त्यांनी हीच लय कायं राखत हा निर्णायक सेट २१- १८ असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. पुरुषांमध्ये जळगांव आणि नांदेड यांना संयुक्त तिसरा क्रमांक मिळाला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहूरल देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर सिग, अखिल भारतीय मराठा महासंघचे सरचिटणीस प्रमोद जाधव, क्रीडा संघटक तथा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनचे सरचिटणीस योगेंद्र पांडे, तांत्रिक समितीचे प्रमुख विनय मुन, नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, सचिव आणि या स्पर्धेचे आयोजन प्रमुख दिपक निकम, मराठा महासंघाचे युवा अध्यक्ष व्यंकटेश मोरे, गणेश माळवे, डॉ. हनुमंत लुंगे, स्पर्धा सचिव आनंद खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलतांना राहूल देशमुख यांनी सांगितले की, खेळाडूंनी चांगली मेहनत करून आपल्या क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून देशाचे नांव उज्वल करावे. यासाठी खेळाडूंना ज्या ज्या सुविधा आणि मार्गदर्शन पाहिजे आहे, त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत असे सांगून विजेत्या खेळाडूंचे अंभिनंदन केले आणि या राज्य स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी प्रमोद जाधव, चंद्रशेखर सिंग आणि चंद्रकांत बनकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश वाघ, योगेश पाटील ज्योती निकम, आनंद चकोर, प्रवीण घोगरे, शैलेश रकिबे, सतीश बोरा आणि सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल -
*पुरुष* - १) नागपूर - विजेता , २) वर्धा - उपविजेता ३) जळगांव आणि नांदेड - संयुक्त तिसरा क्रमांक.
*महिला* - १) नाशिक - विजेता , २) अमरावती - उपविजेता. ३) पुणे आणि सोलापूर - संयुक्त तिसरा क्रमांक.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI