अमरावती, 14 जुलै (हिं.स.) १3 जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास स्थानिक हिंदू स्मशानभूमीत एक तरुणी एकटी आगीसमोर स्मशानात मंत्रोच्चार करीत असल्याचे शेतातून परतणाऱ्या तीन युवकांच्या निदर्शनास आले. या अकल्पित प्रसंगाने मनात भीतीचे काहूर दाटलेल्या तरुणांनी गाव गाठून माहिती दिली. ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होताच ती तरुणी अंधारात गडप झाली. या घटनेने रिद्धपूर परिसरात चर्चेला उधाण आले आहे. 'आषाढ कृष्ण' अर्थात १२ जुलै रोजी उत्तराषाढा अंधाररात्री १० वाजेच्या सुमारस तीन तरुण शेतीतून हिंदू स्मशानभूमीजवळून घरी परत येत होते. स्मशानभूमीजवळून एकमेकांच्या हिमतीने चालत असताना प्रवेशद्वारावर दिवा जळत असल्याचे त्यांनी पाहिले आणि यामुळे आधीच घाबरगुंडी उडाली असलेल्या त्या तरुणांची एक तरुण स्त्री एकटी आगीसमोर स्मशानात मंत्रोच्चार करीत असल्याचे पाहून पाचावर धारण बसली. अर्थात त्यांना ती नेमकी काय उच्चारत आहे, हे कळलेच नाही. गडद अंधारात या अकल्पित आणि भीतीचे कापरे उडविणाऱ्या घटनेने त्यांनी गाव गाठणे उचित मानले. गावाजवळ पोहोचत असतानाच अनेक तरुणांना फोनवरून माहिती दिली. वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि साधारणतः २० तरुणांनी स्मशानाकडे आगेकूच केली. तरुणाईचा जथा आपल्याकडे येत असल्याचे पाहून तथाकथित मांत्रिक महिलेने अंधाराच्या आडोशाने पळ काढला. मोबाइल आणि टॉर्च घेऊन तथाकथित मांत्रिक महिलेची तासभर शोधाशोध करण्यात आली. परंतु, शेजारी नदीपात्र, उंचसखल शेतशिवार आणि लपण्याजोगी झुडुपे यामुळे तिचा पत्ता लागला नाही. अखेर शोधमोहीम थांबवून सगळ्यांनी घरचा रस्ता धरला. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सभापती तात्यासाहेब मेश्राम म्हणाले की, सदर तरुणी तरी आत्म्याला जागृत करण्यासाठी तांत्रिक साधना करीत होती. तिला कुणीतरी सुपारी देऊन हा तांत्रिक सोपस्कार पार पाडण्यास सांगितले असावे, अशा चर्चांना उधाण आले. तथापि, ठामपणे कुणीही काहीही सांगण्यास तयार नव्हते. कोणतीही भीती बाळगण्याचे काहीएककारण नाही. ती महिला जर सशक्त असती, तर तिला पळून जाण्याचे कारण नव्हते. ही सर्व अंधश्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी