अमरावती, 14 जुलै (हिं.स.)। आंध्र प्रदेशच्या अन्नामय्या जिल्ह्यातील पुल्लमपेटा मंडळात रविवारी रात्री उशिरा अपघात घडला. आंब्यांनी भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन रेड्डीपल्ली चेरुवूजवळ उलटल्यानं ९ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर १० मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये चित्तम्मा (२५), सुब्बारत्नम्मा (४५), गजला दुर्गय्या (३२), गजला श्रीनू (३३), गजला लक्ष्मी देवी (३६), राधा (३९), गजला रमण (४२), वेंकट सुब्बम्मा (३७), आणि मुनिचंद्र (३८) यांचा समावेश आहे.
अपघातग्रस्त ट्रक राजमपेट येथून आंबे घेऊन रेल्वे कोडुरूकडे निघाला होता. ट्रकमध्ये २१ मजूर होते, त्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. हे सर्व मजूर इसुकुपल्ली परिसरात आंबे तोडून बाजारात विक्रीसाठी नेत होते. ट्रकमध्ये ३० ते ४० टन आंब्यांचे ओझं होते.
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, रेड्डीपल्ली चेरुवूजवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या कारला वाचवताना ट्रक उलटला. ट्रक उलटताच त्यातील वजनदार आंबे आणि कैऱ्या थेट मजुरांच्या अंगावर पडल्या. घटनास्थळीच ८ मजुरांचा मृत्यू झाला आणि १ मजुराचा मृत्यू रुग्णालयात झाला.
अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. जेसीबीच्या मदतीने अडकलेली मृतदेह बाहेर काढण्यात आली. जखमींना तातडीने राजमपेट शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून, जखमींच्या योग्य उपचारांची खातरजमा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकार पीडित कुटुंबीयांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule