निफाड, 14 जुलै (हिं.स.)।
म्हाळसाकोरे भुसे शिवारात पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी दरोडा टाकण्यात यशस्वी झाले. तर, काही वस्तीवरील नागरिक जागे झाल्याने त्यांचा डाव फसला. एका ठिकाणी दरोडेखोरांनी एका नागरिकास मारहाण करीत लाखोचा ऐवज लंपास केला आहे. म्हाळसाकोरे येथील शिवाजी वाळके हे रात्री वस्तीवरील घरी झोपलेले असताना रात्री बारा वाजेच्या पाच ते सहा दरोडेखोर तोंडावर काळा कपडा बांधून आले. त्यांनी तेथे वाळके यांना मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांनी घरातील महिलांकडे मोर्चा वळवला. परंतु आवाज देऊन दरवाज्याची कडी उघडू नका, असं सांगितल्यावर मुलांनी दरवाजा लावून धरला. त्यामुळे गोंगाट झाल्याने तिथून दरोडेखोरांनी पळ काढला. त्यांनी अर्जुन एकनाथ वाळके यांच्या वस्तीवर घराच्या बाहेर कड्या लावून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. माणसे जागे झाल्यावर पळ काढत त्यानंतर भहिरु भुसारे यांच्या वस्तीवर जाऊन दरवाजाला धक्के दिले. त्यानंतर त्यांनी मोर्चा राजू दत्तू, आबा मुरकुटे यांच्या वस्तीकडे जाऊन दरवाजा तोडत राजूला मारहाण केली. सर्व महिलांच्या पोती, कानातले सोने काढून घेत पैशांची मागणी केली. त्यानंतर चोरांनी पळ काढला. दरोडेखोर पाच ते सहा जण होते. ते मराठी व हिंदी भाषेचा वापर करत होते. चार ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न झाला. पहाटे चार वाजेपर्यंत दरोडेखोर या भागात धुमाकूळ घालत होते.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI