अहिल्यानगर दि. 14 जुलै (हिं.स.) :- नगर शहराच्या सुपुत्रांनी राष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी ही फक्त त्यांची नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर करांची शान वाढवणारे आहे. प्रज्वल आणि आर्यन सत्रे या दोघांनी कठोर मेहनत, शिस्त, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे .अशा खेळाडूंना वेळोवेळी प्रेरणा देणे आणि त्यांचा गौरव करणे हे आमचे सामाजिक व धार्मिक कर्तव्य आहे,असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिराचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले.
नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत प्रज्वल सत्रे याने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल व आर्यन सत्रेच्या खेळातील योगदानाबद्दल शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी महंत संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, विजय कोथिंबीर, बापूसाहेब एकाडे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, प्रा. माणिकराव विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड.आगरकर पुढे म्हणाले, श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट केवळ धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमापुरते मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातही सक्रीय आहे. युवकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अशा सत्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रज्वल व आर्यन यांचे पुढील वाटचाली साठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रज्वल सत्रे म्हणाला, श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. माझ्या यशामागे माझे प्रशिक्षक, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे मोलाचे योगदान आहे. हा गौरव मला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देतो. पुढील काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा माझा निर्धार आहे.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni