अकोला, 2 जुलै (हिं.स.)। शेतीचे वन्य जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी झटका यंत्र उपयुक्त ठरते. बार्शिटाकळी पंचायत समितीतर्फे उपकर योजनेतून शेतक-यांना झटका यंत्रासाठी ९० टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन गटविकास अधिका-यांनी केले आहे.
रानडुक्कर, रोही, हरीण यासारख्या वन्य प्राण्यांमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे संरक्षणासाठी झटका यंत्र उपयुक्त आहे. सौर, वीज झटका यंत्राचा वापर करण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. त्यामुळे बार्शिटाकळी पंचायत समितीच्या उपकर निधीतून सौर, वीज झटका यंत्र, बॅटरी १२ व्होल्ट, १२ ॲम्पिअर, सोलर प्लेट कमीत कमी ४० वॅट चार्जर, क्लच वायर – १.५. एमएम थिकनेस रस्ट फ्री मटेरिअल १० किलो, इन्सुलेटर हुक्स हाय क्वालिटी व्हर्जिन मटेरियल २०० नग आदी खरेदीवर ९० टक्के अनुदान देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात जनावरे येण्यापासून रोखली जातील व पीकांचे संरक्षण होईल.तालुक्यातील सर्वसाधारण शेतक-यांनी पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीत संपर्क करून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा. ग्रामसभेच्या शिफारसीसह डिजीटल बार कोड असलेला किंवा ग्राम महसूल अधिकारी यांचा १ एप्रिल २०२५ नंतरचा सात बारा, आधारपत्राची छायाप्रत, शेतकरी ओळखपत्र किंवा नोंदणीच्या पावतीची छायाप्रत लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे