
मुंबई, 04 मार्च (हिं.स.)। राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असताना महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ते स्वतः सभागृहात उपस्थित राहण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारी सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करतील, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष सुरुवातीला राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही होते. मात्र अखेर आघाडी धर्म जपत काँग्रेसने शरद पवार यांच्या नावाला हिरवा कंदिल दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाचे तसेच उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, असा आग्रह होता. राज्यसभेची जागा काँग्रेसला आणि विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला द्यावी, अशी भूमिका हायकमांडसमोर मांडण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्यानंतर समीकरणे बदलली.
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असून आघाडी मजबूत ठेवण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असावा. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule