
रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे एसटीचे चालक वाहक यांच्या कामात अडथळा आणून त्यांना मारहाण करणाऱ्या सनी संजय नलावडे व कौस्तुभ पाटणे (दोघेही रा. खेड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना काल (१६ मार्च) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद महादेव माने (वय ४२, चालक-वाहक- रोहा एसटी आगार, रा. मु. पो. नेरले, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. रोहा एसटी आगार) हे आपल्या ताब्यातील एसटी बस (क्र. एमएच १४ केक्यू ३९७०) चिपळूण ते खेड अशी घेऊन येत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे समोरून येणारी टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाडीच्या (क्र. एमएच ४६ एयू ३७१७) चालकाने त्याच्या वाहनाचे प्रखर दिवे लावले. त्यामुळे श्री. माने यांच्या डोळ्यांना त्रास झाला. त्यावेळी फिर्यादी यांनी अपर-डीपर लाइटचा इशारा दिला; परंतु आरोपीने त्याच्या गाडीचा प्रकाश कमी केला नाही. उलट संशयित आरोपी सनी नलावडे व कौस्तुभ पाटणे या दोघांनी एसटी बसच्या ड्रायव्हर बाजूचा दरवाजा उघडून फिर्यादी यांना बाहेर ओढून मारहाण केली. तसेच त्यांना खाली पाडले. यामध्ये त्यांच्या उजव्या डोळ्याला तसेच डोक्याला जखम होऊन दुखापत झाली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी