
परभणी, 17 मार्च (हिं.स.)। लाच स्वीकारल्याप्रकरणी तलाठी विकास शारंगधर मार्डीकर (वय ५६) यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय क्र. १, गंगाखेड यांनी १ वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परभणी युनिटने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मार्डीकर हे सज्जा वडगाव स्टेशन, ता. सोनपेठ येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांनी तक्रारदाराच्या भावाच्या नावावर मंजूर झालेल्या मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या १० लाख रुपयांच्या कर्जाच्या फेरफार नोंदीची नक्कल देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली होती. पंचांसमक्ष ही रक्कम स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले होते. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने आरोपीला कलम ७ व १३(१)(ड), १३(२) अन्वये दोषी ठरवत शिक्षा सुनावली. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. डी. वाकोडकर यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची माहिती किंवा तक्रार असल्यास विभागाशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis