
रायगड, 17 मार्च (हिं.स.) : माणगाव – माणगाव पोलीस ठाणे हद्दीत भरधाव व निष्काळजी वाहनचालकामुळे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात रिक्षातील प्रवाशांसह चालक जखमी झाले असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सुमारास मौजे रातवड गावाच्या हद्दीत महादेव ढाबा समोर घडला. फिर्यादी त्यांच्या ताब्यातील टँकर (क्र. GJ-12-BY-8713) मुंबईकडे नेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा ठेवला होता.दरम्यान, आरोपीने त्याच्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH-02-EQ-3952) भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून पार्क केलेल्या टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील प्रवासी तसेच चालक किरकोळ ते गंभीर जखमी झाले असून रिक्षालाही मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८०/२०२६ नोंदवण्यात आला असून, मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १८४ तसेच भा.न्या.सं. कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) नुसार गुन्हा दाखल केला गेला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मंदर लहाने करीत आहेत.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)