चाकू हल्ल्यानंतरही पोलिसांची धाडसी कारवाई; मुख्य आरोपीसह सहा जण जेरबंद
परभणी, 17 मार्च (हिं.स.) । जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाणे हद्दीत दरोडेखोराला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र गंभीर जखमी अवस्थेतही पोलिसांनी धाडस दाखवत मुख्य आरोपीसह
चाकू हल्ल्यानंतरही पोलिसांची धाडसी कारवाई; मुख्य आरोपीसह सहा जण जेरबंद


परभणी, 17 मार्च (हिं.स.) । जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाणे हद्दीत दरोडेखोराला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र गंभीर जखमी अवस्थेतही पोलिसांनी धाडस दाखवत मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेला सराईत आरोपी दीपक बिरजू भोसले हा शेतशिवारात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली 16 मार्च रोजी सायंकाळी कारवाई करण्यात आली.

आरोपीला पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना दीपक भोसले याने अचानक धारदार चाकूने पोलीस अंमलदार निलेश भुजबळ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भुजबळ गंभीर जखमी झाले. तरीही त्यांनी हार न मानता सहकाऱ्यांसह आरोपीचा पाठलाग सुरू ठेवला आणि अखेर आरोपीसह त्याच्या साथीदारांना पकडण्यात यश मिळवले.

या प्रकरणात दीपक बिरजू भोसले (वय 30), राजा उर्फ कोयत्या लक्ष्मण चव्हाण, एकनाथ अंबादास भोसले (वय 35), नन्नी सखाराम पवार (वय 45), वैशाख बिरजू भोसले (वय 32) आणि मेकाप उर्फ गिरीश भोसले (वय 30, रा. वालूर, ता. सेलू) या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, जखमी पोलीस अंमलदार भुजबळ यांना तत्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पाठीत चाकू खोलवर अडकलेला असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणी मुख्य आरोपी दीपक भोसले याच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande