छत्रपती संभाजीनगर, 4 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यातील प्रती पंढरपुर येथे आषाढी एकादशीनिमित्त 10 ते 12 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. वारकरी भाविकांना सुरक्षा, स्वच्छता, सेवा देण्यासाठी सर्व यंत्रणानी दक्ष रहावे. प्रत्येक विभागाने समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, भाविकांना विनासायास दर्शन व्हावे. प्रत्येक भक्त व्हीआयपी समजून त्यांना सेवा देण्यात यावी. मंदीर परिसरात विक्री स्टॉल, फिरते विक्रेते यांच्यामुळे भविकांना नाहक त्रास होऊ नये. खाद्य पदार्थ विक्री स्टॉल वर अन्न औषध प्रशासनाने विशेष लक्ष ठेवावे. आरोग्य विभागाने आपले संपूर्ण पथक यात्रा काळात कार्यन्वित ठेवावे. 24 तास ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध ठेवावी. तसेच डॉक्टर, नर्स व स्वंयसेवी संस्थाची मदत घेऊन रक्तदान करण्यास भाविकांना प्रोत्साहित करावे. विद्युत विभागाने मंदीर परिसरातील रहाट पाळणे आदी विद्युत जोडण्यांना परवाने देताना विशेष काळजी घ्यावी.रात्रीच्या वेळी विशेष पथकांमार्फत निगराणी करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री, वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिराकडील रस्त्याची दुरुस्ती करावी व नगर नाका ते मंदीरपर्यत बंद पडलेले विद्युत खांब दुरुस्ती करावी.
पोलीस प्रशासनाने भविकांच्या तसेच महिला बालके यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. छत्रपती संभाजीनगर – पुणे महामार्ग हा एमआयडीसी वाळूजला लागून असल्याने वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल करुन जड व लहान वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. भाविकांना संरक्षण द्यावे. तसेच चोरी व अन्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशात पोलीस तैनात करावे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवावे. भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणा कार्यान्वित करावी. कमीत -कमी वेळेत भविकांनी दर्शन घेऊन मंदीर परिसरात होणारी गर्दी टाळावी. तसेच मंदीर परिसरात मंदीराचे स्वंयसेवक, यात्रेच्या काळातील स्वंयसेवी संस्था यांची मदत घेऊन पोलीस प्रशासनाने भाविकांना मार्गदर्शन करावे. हरवलेल्या व्यक्ती, बालके यांच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा ठेवावी.शहरातून पंढरपूर कडे जाणारा एक रस्ता खुला ठेवावा. हलके तसेच राज्य परिवहन बसेस, स्मार्ट सिटी बसेस, रिक्षा चालक यांच्यात योग्य समन्वय साधून भाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी ए.एस.क्लब येथे योग्य थांबा उपलब्ध करुन देण्यात यावा. तेथे 24 तास मार्गदर्शक उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच योग्य दिशादर्शक फलक उपलब्ध करुन देण्यात यावे. यात्रा संपल्यानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता मोहिम महानगरपालिकेने करावी. तसेच यात्रा काळातही स्वच्छतेकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष द्यावे. तसेच फिरते सार्वजनिक शौचालाय जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध करुन द्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या. भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासन कटिबद्ध आहे असे यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने