राजकीय वर्तुळात चर्चेला पेव, उत्सुकता शिगेला
मुंबई, 5 जुलै (हिं.स.) : दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेले राज आणि उद्धव ठाकरे तब्बल 19 वर्षांनी पुन्हा एकाच व्यासपीठावर आले. त्यांचे एकत्र येणे नैमित्तीक की, राजकारणातही एकत्र येणार ? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला असून राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटला असून मराठी माणसांची उत्सुकता शिगेला गेली आहे.
शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर राज आणि उद्धव दोघे केवळ कौटुंबिक सोहळ्यात आणि सुख-दुःखात एकत्र दिसले. परंतु, त्यांची राजकीय वाटचाल, युत्या-आघाड्या आणि भूमिका नेहमीच वेग-वेगळ्या राहिल्यात. दोन्ही भावंडांनी एकत्र यावे अशी सदिच्छा वेळोवेळी व्यक्त होत राहिली. राज-उद्धव यांच्यातील राजकीय मतभेदांच्या पुलाखालून गेल्या 19 वर्षात बरेच पाणी वाहून गेले. अखेर ज्या मराठी भाषेच्या मुद्यावर दिवंगत बाळासाहेबांनी आपले समाजकारण आणि राजकारण सुरू केले. त्या मराठीच्या मुद्यानेच दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणले. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेली दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं, एकाच मंचावर एकत्र आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जवळपास 2 दशके राजकीयदृष्ट्या दुरावलेले दोन ठाकरे बंधू आजस शनिवारी एकत्र आले. परंतु भविष्यात दोघांच्या राजकीय वाटा एकत्र येतील का याविषयी मराठी माणसाच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.
मुंबईच्या वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित केलेल्या विजय मेळाव्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी झाले होते. उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यामागे मराठी भाषेवरील प्रेम हेच प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय व सामाजिक वातावरण पेटलेले पाहायला मिळाले. त्यानंतर विविध स्तरातून विरोध वाढल्यानंतर त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मराठीच्या विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर केवळ दोनच खुर्च्या, दोनच नेते होते. मागे महाराष्ट्राचा नकाशा होता. तेथे मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी व सदस्य, मराठी प्रेमी, मराठी कलाकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष बाब म्हणजे जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाने सहा थरांचा मानवी मनोरा रचत मराठी भाषेला सलामी दिली.
राज ठाकरे जेव्हा मेळाव्याच्या स्थळी हजर झाले, तेव्हा त्यांनी खांद्यावर निळी मफलर टाकलेली होती. डोळ्यांवर गॉगल होता. पूर्वी राज ठाकरे भगवी शाल वापरायचे, हळूहळू करडा रंग आणि राखाडी रंग वापरु लागले. आजच्या कार्यक्रमात त्यांनी थेट निळी मफलर खांद्यावर टाकल्याने यातून कोणता राजकीय संदेश ते देतायत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी देखील निळा शर्ट परिधान केलेला होता. उद्धव ठाकरे मात्र आपल्या नेहमीच्या लूकमध्ये म्हणजे सदऱ्यामध्ये होते. राज ठाकरेंचे भाषण प्रथम झाले. ते जेव्हा खाली बसले, तेव्हा ज्येष्ठ बंधू उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
मराठीजन आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरळीसह आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. कोणी मराठीशी संबंधित विविध मजकूर लिहिलेले तसेच बाराखडी असलेले टी-शर्ट घालून आले आहे. तसेच अनेकांच्या डोक्यावर ‘मी मराठी’ लिहिलेली टोपी पाहायला मिळत आहे. लेझीम व बँड पथकाचा ताल आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असो, मराठी शिक, नाहीतर निघ…आदी विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला आहे. तसेच मेळाव्यापूर्वी एनएससीआय डोम येथे मराठी लोकसंगीताचे सादरीकरणही झाले
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी