मुंबई, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील. या प्रकल्पग्रस्तांना नियमाप्रमाणे सर्व लाभ देण्यात यावेत अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या. मंत्रालयात आज गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसदर्भात आयोजित बैठकीवेळी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल बोलत होते.
यावेळी पुनर्वसन उपसचिव श्री. बागडे, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्यासह संबंधित अधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणारे मात्र प्रलंबित असेलेले सर्व लाभ लवकरात लवकर देण्याच्या सूचना देऊन राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, धरणग्रस्तांचे दाखले देण्याची प्रक्रिया गतीने करावी. वाढीव कुटुंबांचा लाभ नियमानुसार देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. पुनर्वसीत गावातील नागरी सुविधा पूर्ण कराव्यात. तसेच पर्यटन, मासेमारी आणि गाळपेरीबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर