पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.) : सामर्थ्यवान जगासाठी भारत समर्थ असावा आणि मृत्युंजय भारतासाठी हिंदुत्व प्रभावी हवे, असे प्रतिपादन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात आयोजित 'मृत्युंजय भारत' या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी लिखित 'हमारा सांस्कृतिक चिंतन' या पुस्तकाचा आरती देवगावकर यांनी अनुवाद केला असून, मोरया प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. या वेळी कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. नाना जाधव आणि मोरया प्रकाशनाचे दिलीप महाजन उपस्थित होते. भारताचा इतिहास हा पराभवाचा नसून संघर्षाचा आहे. आजही तो थांबलेला नसल्याचे गोविंददेव गिरीजी यांनी सांगितले. ते म्हणाले, देवत्वाची भावना आणि दृढ श्रद्धा हे भारताच्या मृत्युंजयाचे गमक आहे. भाषांचे आणि प्रांतांचे भेद आपण आज निर्माण केले आहेत. मात्र, तीर्थयात्रांमधून देशाचे एकत्व प्रकट होते. म्हणूनच हा देश अमेरिकेसारखा राज्यांचा संघ नसून, स्वयंभू चैतन्य असलेला देश आहे. विश्वाला सामर्थ्यवान करण्यासाठी भारत समर्थ असावा आणि भारताला समर्थ राहण्यासाठी हिंदू समर्थ असावा, असेही गोविंददेव गिरीजी यांनी सांगितले. भैयाजी म्हणाले, ग्रंथ, मंदिरे आणि आचरणामुळे भारत संघर्षातही टिकला हे खरे आहे. पण त्यांच्या संपण्यामुळे भारत संपेल हा गैरसमज आहे. बहुकेंद्रीत समाज नियंत्रण असलेल्या भारताच्या विकासात साधूसंत, शूर महापुरुष, समाजसुधारक आणि सामान्यांचे मोठे योगदान आहे. समाजाला दोषमुक्त ठेवणाऱ्या समाजसुधारकांची एक मालिकाच आपल्याला लाभली आहे. हिंदू समाजच आपल्या संस्कृतीला नष्ट करू शकतो. म्हणूनच त्याला जागृत ठेवण्याचे काम हजारो वर्षांपासून चालू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे त्याचे आजचे स्वरूप असल्याचेही भैयाजींनी सांगितले. प्रा. नाना जाधव म्हणाले, भारतीय संस्कृती प्रवाहित ठेवण्यासाठी ऋषी, साधूसंत, युगदृष्टे, राष्ट्रपुरुष आणि समाजसुधारकांचे मोठे योगदान आहे. त्याची अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे. संघ शताब्दी वर्षात मूलभूत चिंतन असलेले पुस्तक प्रकाशित होत असल्याचा आनंद दिलीप महाजन यांनी व्यक्त केला. गौरी देव यांनी सूत्रसंचालन केले. कौस्तुभ देव यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु