मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेना उबाठाचे आंदोलन, 90 जणांवर गुन्हे दाखल
सिंधुदुर्ग, 13 ऑगस्ट (हिं.स.)। अकरा वर्षे उलटली तरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. महामार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. याविरोधात आज महामार्गावर हुमरमळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने रास्ता
आंदोलन करताना धरपकड करताना


सिंधुदुर्ग, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

अकरा वर्षे उलटली तरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. महामार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. याविरोधात आज महामार्गावर हुमरमळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गावर दुग्धाभिषेक करण्यात आले. रस्ता रोको आंदोलन दरम्यान महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन दरम्यान तब्बल १० मिनिटे महामार्ग ठप्प झाला होता. आंदोलनकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात माजी आ. वैभव नाईक यांच्यासह ९० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून यात मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र याकडे शासन लक्ष देत नसल्याचा आरोप करत याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आज मुंबई गोवा महामार्गावर हूमरमाळा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळपासून महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हुमरमाळा येथे महामार्गाच्या लगत मोठा स्टेज उभारून या ठिकाणी माजी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनापूर्वी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी माजी आ. परशुराम उपरकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, सुशांत नाईक, राजन नाईक आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी माजी. आ. वैभव नाईक आंदोलन कर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गेली अकरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. हा रस्ता खड्डेमय झाला आहे. अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांनी आता भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही. सद्यस्थितीत कामाची गती पाहता अजून दोन तीन वर्षे हा महामार्ग पूर्ण होऊ शकेल असे वाटत नाही. त्यामुळे पुढील वर्षभरात हा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी आजचे हे आंदोलन आहे. सन २०१४ मध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. या कामात एकूण सहा टप्पे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन टप्पे पूर्ण करण्यात आले आहे. मात्र त्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. या मार्गावरील कणकवली, पणदूर येथील उड्डाण पुलाला पाच सहा वर्षात भेगा गेल्या आहेत. अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्ग सुस्थितीत झाला पाहिजे म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

यानंतर शिवसैनिकांनी महामार्गावर ताडपत्री घालून त्याठिकाणी चक्काजाम केला. शिवसैनिकांचा जमाव जास्त असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजू जाम झाल्या होत्या. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या. महामार्गावर केलेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

कडक पोलीस बंदोबस्त

मुंबई गोवा महामार्गावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याने हुमरमाळा येथे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

महामार्गावर दुग्धाभिषेक

महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यातून अपघात होत आहेत याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्धव सेनेच्यावतीने महामार्गावर दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच फुल वाहून रस्त्याची शांती करण्यात आली.

सुमारे ९० जणांवर गुन्हा दाखल

हुमरमाळा येथे महामार्ग अडविल्याप्रकणी उद्धवसेनेचे माजी आ. वैभव नाईक यांच्यासह सुमारे ९० जणांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Prasad p


 rajesh pande