राष्ट्र, धर्म आणि संस्कृती रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
* गुरुपीठात गुरुचरित्र आणि हवनयुक्त नवनाथ पारायण उत्साहात * सेवामार्गाच्या श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिकेचे प्रकाशन नाशिक, 17 ऑगस्ट (हिं.स.) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने राष्ट्र, धर्म आणि संस्कृती रक्षणाच्या कार्यालाच सर्वोच्च प्राध
गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे


* गुरुपीठात गुरुचरित्र आणि हवनयुक्त नवनाथ पारायण उत्साहात

* सेवामार्गाच्या श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिकेचे प्रकाशन

नाशिक, 17 ऑगस्ट (हिं.स.) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने राष्ट्र, धर्म आणि संस्कृती रक्षणाच्या कार्यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी केले. तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्‍यांनी टाळ्यांचा कडकडाट करून गुरुमाऊलींना प्रतिसाद दिला.

सेवामार्गातर्फे राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेल्या दोन दिवसीय हवनयुक्त नवनाथ पारायणामध्ये ३५५१ सेवेकरी आणि एक दिवसीय गुरुचरित्र पारायणामध्ये ११२१ सेवेकर्‍यांनी सहभागी होऊन श्रींच्या चरणी सेवा समर्पित केली. शनिवारी (१६ऑगस्ट) परमपूज्य गुरुमाऊलींचा साप्ताहिक सत्संग झाला. आपल्या हितगुजामध्ये गुरुमाऊलींनी वरील दोन्ही शक्तिशाली सेवांचा उल्लेख करून या सेवा राष्ट्रासाठी समर्पित करण्यात आल्या आहेत असे जाहीर केले. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती प्रमाणेच सेवामार्गातर्फे मातृ ,पितृ ,अतिथी देवो प्रमाणेच राष्ट्र देवो भव ही शिकवण रुजवली जाते. राष्ट्र ,धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठीच सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात असे त्यांनी स्पष्ट केले.

बारा लक्ष जप लिहिण्याचे आवाहन

सेवेकर्‍यांनी फावल्या वेळेत संस्कार वहीमध्ये दत्त जयंतीपर्यंत बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप लिहावा. या वह्या गाणगापूर दत्तपिठावर होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या मासिक सत्संगाला जमा कराव्यात,त्याचबरोबर सध्या श्रावण महिन्यात भगवान शिवाची जास्तीत जास्त सेवा रुजू करावी आणि व्यास महर्षींनी भगवान गणेशाकडून श्रीमद् भागवत ग्रंथाचे लेखन केल्यामुळे गणपती पंधरवड्यामध्ये श्रीमद् भागवत ग्रंथाचे पारायण करावे, शारदीय नवरात्रोत्सवात श्री दुर्गा सप्तशतीचे जास्तीत जास्त पाठ करावेत असे आवाहन गुरुमाऊलींनी केले.

दादासाहेब, नितीनभाऊ यांचे मार्गदर्शन

गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा मोरे आणि गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांनी नवनाथ आणि गुरुचरित्र पारायण करणाऱ्या सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. गोपाळकाला आणि नवनाथ भक्तीचे महत्त्व श्री चंद्रकांत मोरे यांनी सांगितले तर त्र्यंबक नगरीचे आणि गुरुपीठात होणाऱ्या सेवेचे महत्त्व श्री.नितीन मोरे यांनी नमूद केले.

सेवामार्गाच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन

सेवामार्गाच्या श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिका २०२६ चे प्रकाशन परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते यावेळी करण्यात आले. सण,वार व्रत,वैकल्ये याबरोबरच लक्ष्मीपूजनाची मांडणीसह माहिती ,राहू काळ ,वेगवेगळ्या शास्त्रांसह मूल्यसंस्कार, गर्भसंस्कार, विवाह संस्कार आदी विषयांची अत्यंत उपयुक्त माहिती २०२६ च्या मार्गदर्शिकेत समाविष्ट आहे. स्वच्छ, सुंदर,छपाईसह परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद या मार्गदर्शिकेला लाभला आहे. ज्या घरामध्ये ही मार्गदर्शिका असते तिथे संस्कृती नांदते असे गुरुमाऊली नेहमी आवर्जून सांगत असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande