अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या मिशन १०० स्काॅलरशीप या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातील पाचवी व आठवीतील तब्बल १३ हजार ३४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती सराव परीक्षा दिली. ही परीक्षा जिल्ह्यातील सर्व १४ पंचायत समिती क्षेत्रात घेण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेकरीता आत्मविश्वास वाढावा, भीती दूर व्हावी आणि गुणवत्तावृद्धीसाठी प्रभावी तयारी व्हावी, या उद्देशाने ही चाचणी घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या संकल्पनेतून या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या सराव परीक्षेत इयत्ता पाचवीचे ९२६८ व आठवीचे ३७६६ विद्यार्थी सहभागी झाले. जिल्ह्यातील मराठी, उर्दू व सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परीक्षेत भाषा, गणित, इंग्रजी व बुद्धीमत्ता चाचणी हे विषय समाविष्ट होते. पेपर तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पाच तज्ञ शिक्षकांची निवड करून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या. या परीक्षेचे उत्तरपत्र तपासणीचे काम सध्या तालुकास्तरावर सुरू असून, प्राविण्य प्राप्त निकाल लवकरच जाहीर होणार आहे. परीक्षेच्या वेळी जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच विषय तज्ञांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. ही परीक्षा शाळांच्या मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली पार पडली. अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मोठ्या प्रमाणात यश मिळवावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता महापात्र यांनी सांगितले. पुढे शिष्यवृत्ती सराव परीक्षा नियमितपणे घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गही सुरू केले जाणार आहेत.-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी