अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.)अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून 541 तरुण-तरुणींना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात तरुणाईला रोजगार मिळाल्यामुळे यशस्वी आयोजनाचे हे फलित ठरल्याची भावना मुख्य संयोजक प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांना चांगल्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रा.डॉ.हेमंत देशमुख यांच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या करिता जवळपास चार हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. परंतु दिवसभर पाऊस असताना देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून तरुणांनी मुलाखती दिल्या. दोन हजार उमेदवारांनी मुलाखतीला सामोरे जाऊन नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. ऑन द स्पॉट नियुक्ती असल्यामुळे त्याच दिवशी 541 पात्र बेरोजगारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, सरचिटणीस आ.रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. यावेळी प्रा. शरद तसरे,गणेश रॉय, डॉ.राजीव जामठे, सुनील गव्हाणे यांची विशेष उपस्थिती होती.
दिवसभर चाललेल्या मुलाखती मधून पात्र ५४१ उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. जे उमेदवार मुलाखतीस येऊ शकले नाही अशा उर्वरित उमेदवारांना 1000 जॉब कार्ड च्या माध्यमातून पुन्हा संधी देण्याचे आयोजकांनी ठरविले आहे. नामांकित 38 कंपन्या मध्ये उमेदवारांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये उमेदवारांना नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. पहिल्याच मेळाव्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाल्याबद्दल प्रा.हेमंत देशमुख यांनी आभार मानले आहे. तसेच पावसामुळे जे युवक येऊ शकले नाही अशाकरिता जॉब कार्ड उपलब्ध असून त्या माध्यमातून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न असेल. इच्छुकांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी