अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला हे विदर्भातील औद्योगिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्वाचं शहर... परंतू, याच शहराचं अध्यात्मिक महत्व आणि अध्यात्मिक महतीही तेव्हढीच मोठी.... अकोल्याचं हे अध्यात्मिक महत्व आहेय या गावाचं ग्रामदैवत असणाऱ्या राजराजेश्वरामुळं.... म्हणूनच अकोल्याचं दुसरं नाव आणि ओळख आहेय ती राजराजेश्वरनगरी अशी.... जून्या आणि नव्या अकोल्याच्या अगदी मध्यात वसलेल्या राजराजेश्वर मंदिरानं अकोल्याचं अध्यात्मिक विश्व अतिशय समृद्ध करून सोडलंय. श्रावणातील चारही सोमवार आणि शेवटच्या सोमवारी अकोल्यात होणारी राजेश्वराच्या कावडयात्रेचं महत्व अकोलेकरांसाठी दिवाळीएवढच... स्वातंत्रपूर्व काळाची पार्श्वभूमी असलेल्या विदर्भातील अकोल्याच्या प्रसिद्ध कावड यात्रेला 78 वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा आहे अकोल्याचं अध्यात्मिक विश्व अनेक अर्थांनी समृद्ध करणाऱ्या ग्रामदैवत असणार्या 'राजराजेश्वरा'ची
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजे आज अकोल्यात कावड -पालखी उत्सव साजरा झालाय. हर्र.. बोला महादेव'च्या गजरात 'श्री राज राजराजेश्वराला' लाखो शिवभक्त कावडधारी मंडळांसह युवकांनी जलाभिषेक केला आहे. पालखी-कावड उत्सव पाहण्यासाठी अकोलेकरांची मोठी गर्दी उसळली आहे, आज कावड यात्रा मार्गाला पुर्णता यात्रेचे स्वरूप प्राप्त झालं होतं. अकोल्यात कावड-पालखी उत्सव मोठ्या थाटात साजरा झालाय. कावड-पालखी मिरवणुकीत शहरातील दोनशेवर शिवभक्त मंडळांनी सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि हर्र..बोला महादेव असा जयघोष करीत शिवभक्त राजराजेश्वर मंदिरात जाऊन प्रर्दशिणा घालून जलाभिषेक करीत होते. कावड यात्रेतील शिवभक्तांचे व पालखीचे शहरातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवभक्त मंडळाच्यावतीने पालखी धार्मिक व सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यात आले होते. कावड महोत्सव पाहण्यासाठी लाखो नागरीकांनी गर्दी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे