अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : अकोल्याजवळील मूर्तिजापूर शहराजवळ सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन कोळंबी गावचा २५ वर्षीय तरुण आयुष गाडगे जागीच ठार झाला तर त्याचा साथीदार प्रथमेश भोयर (२४) गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे महामार्गावर रक्ताचे थारोळे व तासभर वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा वरून नागपूरकडे जाणारी एसटी (क्र. एमएच २० जीसी २५९४) आणि मूर्तिजापूरहून कोळंबीकडे जाणारी दुचाकी (क्र. एमएच ३० एजे ८२३९) यांची व्यास हॉटेल जवळ जबर धडक झाली. धडकेचा आवाज एवढा भीषण होता की, दुचाकीचे तीन तुकडे झाले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, मृतक आयुष गाडगे हा रॉंग साईडने वाहन चालवत होता. तसेच त्याने हेल्मेट न घातल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. “नियमांचे पालन केले असते तर आयुषचा जीव वाचला असता,” अशी खंत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित जाधव यांनी व्यक्त केली.
जखमी प्रथमेश भोयर याला तातडीने श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही हेल्मेटचा वापर व वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत बेपर्वा राहणाऱ्या चालकांमुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे