नवी मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)।हवामानात व पर्जन्यमानात झपाट्याने होणा-या बदलांचे परिणाम आपण सारेजण अनुभवत आहोत. हे सुरळीत करण्यासाठी निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकडे प्रत्येकानेच काटेकोर लक्ष देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव आपण आनंदात व उत्साहात साजरा करतानाच निसर्गाचे भान ठेवून पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त साजरा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गतवर्षीच्या नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव स्पर्धा 2024’ च्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना गतवर्षीच्या स्पर्धेचे परीक्षक कलाध्यापक राजेश अहिरे यांनी गणेशोत्सवासारख्या अत्यंत महत्वाच्या उत्सवात मंडळे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत समाजासमोर चांगला आदर्श ठेवत असल्याबद्दल कौतुक केले. यावर्षी मागील वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने मंडळे पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गतवर्षीच्या ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव स्पर्धा 2024’ मधील सर्वप्रथम क्रमांकाने विजेते सेक्टर 17 कोपरखैरणे येथील मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा निकेतन गणेशोत्सव मंडळास रू.25 हजार आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. सर्वच विजेत्या मंडळांना रक्कमेच्या पारितोषिकासह स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली. सेक्टर 10 नेरूळ येथील नवयुग उत्सव मित्र मंडळ हे व्दितीय तसेच सेक्टर 20 तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळ तुर्भे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती से.20, नेरूळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 17 वाशी या दोन मंडळांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविली. इकोफ्रेंडली श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणा-या सेक्टर 8 वाशी येथील युवा गणेश उत्सव मंडळास विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच प्लास्टिकमुक्त पर्यावरणशील सजावट करणारे सेक्टर 4 घणसोली येथील शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळासही विशेष पारितोषिकाने सन्मानीत करण्यात आले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / मेघा माने