नाशिक, 18 ऑगस्ट (हिं.स.) : नाशिकच्या जय भवानी रोडवरील ३९ वर्षीय इसमाकडे सुमारे पावणेदोन लाख रुपये किंमतीचे एमडी अंमली पदार्थ सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की विजय सुकदेव सोनवणे (वय ३९, रा. मराठा निवास, जय भवानी रोड, फर्नांडिसवाडी) याच्याकडे एम. डी. ड्रग्ज असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. सोनवणे याच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्याकडे १ लाख ७० हजार रुपये किमतीचे ३४ ग्रॅम वजनाचे एम. डी. ड्रग्ज व ५ हजार १०० रुपयांचे इतर साहित्य असा एकूण १ लाख ७५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सोनवणेकडे या अमली पदार्थाबाबत माहिती घेतली असता त्याने काही प्रमाणात अमली पदार्थ स्टेफन भाई (रा. वाशी) याच्याकडून व काही अमली पदार्थ रोहित नेहे (रा. विहितगाव) व त्याचा मित्र कैफ पठाण (रा. सिन्नर फाटा) यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस हवालदार बळवंत गोविंद कोल्हे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध एम. डी. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर करीत आहेत.
-------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV